मुंबई बातम्या

नवी मुंबईतील निम्मे रुग्ण मुंबई संपर्कामुळे – Loksatta

नवी मुंबई : नवी मुंबईत करोना रुग्णाची झपाटय़ाने वाढ होत असून रविवापर्यंत रुग्णांची संख्या ही १३१ पर्यंत गेली आहे. यातील निम्मे म्हणजे ६६ करोना रुग्ण मुंबई शहरातील संसर्गामुळे बाधित झालेले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतून दररोज मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्यांमुळे नवी मुंबईतील रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे.

नवी मुंबई शहरातून लाखो नागरिक हे कामानिमित्त दररोज मुंबई शहरात जातात. त्यांचे राहण्याचे ठिकाण नवी मुंबई पण कामाचे ठिकाण मुंबई आहे. सध्या करोनामुळे टाळेबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलीस असे अनेकजण मुंबईमध्ये कामानिमित्त जात आहेत. ते करोनाबाधितांच्या संपर्कात येत आहेत. त्या आपले घरी आल्यानंतर कुटुंबालाही बाधा करीत आहेत. नवी मुंबई सीवूड्स सेक्टर ५० येथे एकत्र कुटुंबात १७ जण राहतात. या कुटुंबातील एक डॉक्टर भायखळा येथील रुग्णालयात काम करतात. ते तेथील रुग्णालयात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने या डॉक्टरांना करोनाची लागण झाली. त्यांच्यामुळे त्यांचे अख्खं कुटुंबच करोनाबाधित झालं आहे.कुटुंबातील १७ जणांपैकी १४ जणांना संसर्ग झाला आहे. त्यांच्यात लहान बाळाचाही समावेश आहे.

करावे येथील करोनाबाधित मुंबईतील शिवडीच्या एका रुग्णालयात काम करतात. तर नेरुळ सेक्टर ८ येथील करोनाबाधित मुंबईतील राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर आहेत. मुंबई शहरातील एका मोठय़ा मॉलमध्ये व्यवस्थापक पदावर काम करणारे एकजण करोनाबाधित झाले आहेत. असे अनेकजण मुंबईमध्ये करोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने व ते नवी मुंबईत रहिवाशी असल्याने त्यांच्या कुटुंबाीयांनाही करोना संसर्ग झाला आहे. १३१ करोना रुग्णांमध्ये अशा प्रकार संसर्ग झालेले ६६ रुग्ण आहेत.

पालिकेने नवी मुंबईत समूह संपर्काचा प्रकार नसल्याचे सांगितले आहे. मात्र मुंबईतील संपर्कामुळे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करूनही अनेकजण बाहेर पडत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 28, 2020 3:24 am

Web Title: half of the covid 19 patients in navi mumbai are due to mumbai contact zws 70

Source: https://www.loksatta.com/navimumbai-news/half-of-the-covid-19-patients-in-navi-mumbai-are-due-to-mumbai-contact-zws-70-2143831/