मुंबई बातम्या

मुंबईत जमावाकडून लॉकडाउनची ऐशीतैशी; चिथावणीखोर घोषणाबाजीसह पोलिसांवर दगडफेक – Loksatta

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउन आणि संचारबंदीचे आदेश लागू असताना याचे उल्लंघन करीत मुंबईतील शिवाजीनगर भागात एका मशिदीजवळ काही लोक जमा झाले होते. याठिकाणी पोलिसांच्या कामात अडथळा आणत त्यांनी चिथावणीखोर घोषणाबाजीसह त्यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, काल (रविवार) संध्याकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. यावेळी घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत होते. दरम्यान, शिवाजीनगर येथील रोड क्रमांक ८ वरील शहिदे आझम मशिदीजवळ संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत सुमारे तीस लोकांनी बेकायदा गर्दी केली होती. या लोकांना संचारबंदीच्या आदेशाचे पालन करण्यास सांगताना घटनास्थळावरुन निघून जाण्याची सूचना पोलिसांनी केली.

मात्र, या जमावातील सुमारे तीस पुरुष आणि दोन महिलांनी पोलिसांविरोधात चिथावणीखोर घोषणाबाजी करीत त्यांच्यावर दगडफेक केली. त्याचबरोबर जमावातील एका व्यक्तीनं एका पोलीस अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडनं हल्ला केला. हा हल्ला चुकवताना संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या शासकीय वाहनांचेही काहींनी नुकसान केले.

याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. त्यानुसार, इतर आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक पैठणकर यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 27, 2020 9:42 am

Web Title: lock down by mobs in mumbai stone throwing at police with provocative slogans aau 85

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/lock-down-by-mobs-in-mumbai-stone-throwing-at-police-with-provocative-slogans-aau-85-2142856/