टाळेबंदीमुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने आजच्या शपथविधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना कोलकाता ते मुंबई असा तीन दिवस प्रवास करून मुंबई गाठावी लागली.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सोमवारी निवृत्त झाल्याने कोलकाता उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती दत्ता यांची गुरुवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. टाळेबंदीमुळे मुख्य न्यायमूर्ती पद बराच वेळ रिक्त राहू नये, म्हणून ते तातडीने स्वीकारण्याचे त्यांनी ठरवले. मात्र टाळेबंदी असल्याने शपथविधीला पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता. त्यावर तोडगा म्हणून न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई हा प्रवास रस्तेमार्गे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शनिवारी सकाळी मुलासोबत कोलकाता ते मुंबई प्रवास सुरू केला.
दोन हजार किलोमीटरहून अधिक प्रवास करून सोमवारी ते मुंबईत दाखल झाले. त्यांना या प्रवासात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित राज्यांतील प्रशासनांना त्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या होत्या.
न्यायमूर्ती दत्ता यांची बढतीवर मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर १९८९ मध्ये वकिलीला सुरुवात केली.
घटनात्मक वाद आणि दिवाणी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. २२ जून २००६ मध्ये त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी निवृत्त
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सोमवारी निवृत्त झाले. मुख्य न्यायमूर्ती नेहमी राज्याबाहेरील असण्याची तरतूद आहे; परंतु न्यायमूर्ती धर्माधिकारी यांना निवृत्तीसाठी महिनाभर अवधी होता. तसेच त्यांच्याकडे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पदाची सूत्रे होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने त्यांचीच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार न्यायमूर्ती धर्माधिकारी यांची गेल्या महिन्यातच मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. अशा प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाचेच मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेले न्यायमूर्ती धर्माधिकारी हे माजी न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यानंतर तिसरे न्यायमूर्ती ठरले.
निवडक मान्यवरांना निमंत्रण
न्यायमूर्ती दत्ता यांचा शपथविधी आज, मंगळवार २८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता राजभवन येथे होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांना मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ देतील. सध्याची परिस्थिती विचारात घेऊन शपथविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांसह केवळ निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 28, 2020 12:46 am
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/judges-three-day-journey-from-kolkata-to-mumbai-abn-97-2143648/