मुंबई बातम्या

मुंबई-पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील लॉकडाऊन 3 मे नंतर शिथील होईल? – ABP Majha

देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे तर राज्यात सर्वाधिक मुंबई-पुणे या पट्ट्यात, एकूण राज्याच्या 80% पेक्षा जास्त रुग्णसंख्या असलेल्या या पट्ट्यात लॉकडाऊन शिथील वाढेल की सर्व देशाप्रमाणेच 3 मे रोजी संपेल, याविषयी मतेमतांतरे आहेत.

मुंबई : केंद्र सरकारने वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत असला तरी पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. इकॉनॉमिक्स टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने शासकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलंय. पुणे आणि मुंबई महानगर क्षेत्रात सातत्याने नवीन कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे 3 मे नंतरही तिथे शिथीलता मिळण्याची शक्यता धूसर आहे. काही शासकीय अधिकाऱ्यांच्या मते मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रातील लॉकडाऊन जूनमध्येही कायम राहू शकतो.

मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्रातच राज्याचं आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्र केंद्रीत आहे.  त्यामुळेच मुंबई-पुणे येथील लॉकडाऊन शिथील करुन अर्थव्यवस्थेला चालना देण्याला सरकारचं प्राधान्य आहे, मात्र दररोज वाढणारी कोरोनाबाधित रुग्णसंख्या सरकारच्या काळजीत भर टाकत आहे.

रात्री उशीरा देशभरातील मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता अन्य छोटी दुकाने काही अटींसह खुली करण्यास केंद्राने मान्यता दिलीय. त्याची अंमलबजावणी राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार होईलच. मात्र रिटेल व्यापारी संघाच्या अध्यक्ष विरेन शाह यांनी सांगितल्याप्रमाणे जर बस आणि लोकल ट्रेन सेवा सुरु होणार नसेल तर मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स वगळता अन्य दुकाने सुरु करण्याच्या निर्णयाला अर्थच उरणार नाही. कारण त्या दुकानांमध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा वेगवेगळी उपनगरे आणि मुंबई शेजारच्या ठाणे, रायगड जिल्ह्यातून किंवा त्या जिल्ह्यातील अन्य महापालिकांमधून येतो. तसंच ग्राहकही संबंध मुंबईतून येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी लोकल किंवा बससेवा सुरु नसतील ते प्रवास करून खरेदीला जाणारच नाहीत.

राज्य सरकारला आर्थिक आघाडीवर कोरोनाप्रमाणेच युद्धपातळीवर लढायचं आहे. मात्र पुणे-मुंबई पट्ट्यातच आर्थिक क्षेत्र एकवटल्यामुळे आणि त्याच भागात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असल्यामुळे राज्य सरकारची दुहेरी कोंडी होत आहे.

राज्य सरकारने काल जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 4447 होता तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात हा आकडा पाच हजारांपेक्षा जास्त आहे. तसंच एकट्या पुण्यात 848 तर पुणे महानगर प्रदेश क्षेत्रात 960 पर्यंत कोरोनाबाधित आहेत.

मुंबईत 983 कंटेनमेंट झोन आहेत. त्यापैकी बरेचसे कंटेनमेंट झोन हे झोपडपट्टी परिसरातले आहेत. त्यामुळेच शासकीय सुत्रांच्या मते मुंबई-पुण्याला सरसकट लॉकडाऊनमधून सूट मिळण्याची शक्यता कमी आहे. मुंबई-पुणे कोरोना व्हायरस स्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकानेही कॉरंटाईन सुविधा मे अखेरपर्यंत ठेवण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं जातंय.

तसंही जोपर्यंत बेस्ट बस आणि लोकल ट्रेन सेवा सुरु होणार नाही, मुंबईचं जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. त्यामुळेच जोपर्यंत कोरोना बाधितांचा कोरोनामुक्त होण्याचा वेग वाढत नाही आणि नव्या लोकांना कोरोनाची लागण होण्याचा वेग कमी होत नाही, तोपर्यंत मुंबई-पुण्यातील लॉकडाऊन शिथील होण्याबाबत काही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/after-may-3-will-the-lockdown-in-mumbai-pune-metropolitan-area-be-relaxed-764446