मुंबई बातम्या

मुंबई महानगरपालिकेने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश – Times Now Marathi

प्रातिनिधीक फोटो& 

थोडं पण कामाचं

  • ‘कोरोना कोविड १९’ व्यतिरिक्त इतर रुग्णांवरील उपचारासाठी मुंबई मनपाचे आदेश
  • ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार वैद्यकीय सेवा सुरू ठेवणे बंधनकारक
  • वारंवार सूचना देऊनही सुरू न होणाऱ्या ‘नर्सिंग होम’चे परवाने होणार रद्द

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने आपल्या क्षेत्रातील सर्व खाजगी ‘नर्सिंग होम’ व खाजगी दवाखाने तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार वैद्यकीय सेवा सुरू ठेवणे बंधनकारक. वारंवार सूचना देऊनही सुरू न होणाऱ्या ‘नर्सिंग होम’चे परवाने होणार रद्द, तर खाजगी दवाखान्यांवर साथरोग कायद्यानुसार कारवाई होणार. ज्या सोसायट्या त्यांच्या परिसरातील दवाखाने सुरू करण्यात अडथळा आणणार त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होणार आहे.

कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

‘कोरोना कोविड १९’ व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचारांसाठी म्हणजेच ‘नॉन कोविड’ उपचारांसाठी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने सुरू ठेवण्याचे आदेश यापूर्वीच महापालिकेद्वारे देण्यात आले आहेत. तथापि, अनेक ठिकाणी अद्याप या सेवा सुरू न झाल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे ‘नॉन कोविड’ रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळण्यात अडथळे येत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन जे खाजगी ‘नर्सिंग होम’ (शुश्रुषा गृह,  polyclinic इत्यादी) अद्याप सुरू झालेले नसतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच बंद असणाऱ्या खाजगी दवाखान्यांबाबत ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ (साथरोग कायदा १८९७) नुसार कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला तर…

सोबतच जे नर्सिंग होम किंवा दवाखाने सोसायटी परिसरात, चाळीमध्ये, भाड्याच्या जागेत किंवा तत्सम ठिकाणी असून ते उघडण्यास सोसायटीतील व्यक्ती, मालक, शेजारी इत्यादींद्वारे अडथळा आणला जात असल्यास; अथवा दवाखाने बंद ठेवण्यासाठी दबाव आणला जात असल्यास; अशाप्रकारे दवाखाने उघडण्यास अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशान्वये अत्यावश्यक सेवेत अडथळा आणल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचे व गुन्हे दाखल करण्याचे संकेत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.

वरील तपशीलानुसार व महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशान्वये “बृहन्मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागातील सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (M.O.H.) आपापल्या कार्यक्षेत्राचे सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षणादरम्यान जे नर्सिंग होम बंद असल्याचे आढळून येतील, त्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही सुरू करावी. तर जे खाजगी दवाखाने बंद आढळून येतील, त्यांच्याबाबत माहिती घेऊन संबंधित डॉक्टर किंवा दवाखाना उघडण्यात अडथळा आणणाऱ्यांवर ‘एपिडेमिक ॲक्ट १८९७’ नुसार कारवाई सुरू करावी, असे आदेश सार्वजनिक आरोग्य खात्याच्या खातेप्रमुखांद्वारे म्हणजेच ‘कार्यकारी आरोग्य अधिकारी’ यांच्याद्वारे विभागस्तरीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखाने यांनी त्यांच्या स्तरावर भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे देण्यात आलेल्या व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही देण्यात येत आहेत. 

खाजगी नर्सिंग होम व खाजगी दवाखान्यांना मुंबई मनपाच्या मार्गदर्शक सूचना

  1. दवाखान्यात येणाऱ्या व्यक्तीच्या शरीराचे तापमान हे ‘वीना स्पर्श’ (Non Contact Temperature) पद्धतीने तपासावे. सदर व्यक्तीच्या शरीराचे तापमान ९८.६ फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास अशा व्यक्तींना तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये किंवा फिव्हर क्लिनिकमध्ये पाठवावे.

  2. एखाद्या व्यक्तीची लक्षणे ही ‘कोरोना कोविड १९’ सारखी असल्यास अशा व्यक्तींना महापालिकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर पाठवावे.

  3. खासगी दवाखान्यांमध्ये ‘नॉन कोविड’ रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. यामध्ये प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब, दमा यासारखे विकार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात यावेत. तसेच सदर व्यक्ती हे त्यांना सांगण्यात आलेले औषधोपचार योग्यप्रकारे घेत असल्याची खातरजमा करावी.

  4. रुग्णांना तपासताना ‘आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय’ यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे परिपूर्ण पालन करावे. यामध्ये प्रामुख्याने मुखावरण (Mask) वापरणे, निर्धारित अंतर ठेवणे (Social Distancing), हातांची स्वच्छता राखणे यासारख्या बाबींचा समावेश आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bmc-asked-private-hospital-clinic-nursing-home-reopen-immediately-mumbai-corona-virus/290422