मुंबई बातम्या

मुंबई, पुण्यातून सोलापुरात शिरकाव सुरूच – Loksatta

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी टाळेबंदी तथा संचारबंदीसह जिल्हाबंदी अशा अनेक कठोर उपाययोजना हाती घेऊ नसुद्धा मुंबई, ठाणे व पुण्यातून सोलापूर जिल्ह्यात दीड लाखापेक्षा अधिक व्यक्ती यापूर्वीच पोहोचल्या आहेत. अलीकडे रस्त्यांवर नाकेबंदी व्यापक प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे सांगितले जात असले, तरी मुंबई, पुण्यातून अजूनही कमी-अधिक प्रमाणात नागरिक येतच असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राज्यात करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव मुंबईसह ठाणे, पुणे परिसरात असताना तेथे रोजगार, नोकरी वा शिक्षणासाठी वास्तव्य करणारे असंख्य सोलापूरकर टाळेबंदीनंतर परतले आहेत. परतलेल्या व्यक्तींची अधिकृत संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे करोना फैलावाच्या दृष्टीने हीच चिंतेची बाब ठरली असताना मुंबई, पुण्याहून सोलापुरात नागरिकांचे परतणे अद्यापि सुरूच असल्याचे दिसून येते.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथून ८४ मजुरांना घेऊ न येणारी मालमोटार मोहोळजवळ पोलिसांनी पकडली असता ही मालमोटार वाटेत कशी रोखण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होतो. अशी काही वाहने पकडण्यात आली तरी प्रत्यक्षात पोलिसांची नाकेबंदी चुकवून सोलापुरात परतणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. वाटेत पोलिसांचे ‘अर्थ’पूर्ण समाधान करून सोलापुरात पोहोचले तरी त्याची माहिती शेजारच्या सजग मंडळींकडून प्रशासनाला दिली जाते. त्यामुळे संबंधित स्थलांतरित व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले जाते आणि नंतर चौदा दिवस गृह विलगीकरणात थांबण्यास भाग पाडल्याचे प्रकार पाहावयास मिळतात.

कोरोनाग्रस्ताचा प्रवास

* ठाणे जिल्ह्यात मुंब्रा येथील एका पोलिसाने  सुमारे ४०० किलोमीटर अंतर दुचाकीने प्रवास करीत  सोलापुरात प्रवेश केला. सोलापुरात त्याची तपासणी केली असता त्याला करोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले. अशा बेफिकीर पोलीस कर्मचाऱ्यावर आता कायदेशीर कारवाई होईलही. परंतु त्याने मुंब्रा येथून दूरचा प्रवास करीत ठाणे, रायगड, पुणे व सोलापूर अशा चार जिल्ह्यंची सीमा ओलांडली कशी, असा सवाल उपस्थित होत आहे.

* पोलिसांनी जिल्ह्य़ात येणारे १७९ रस्ते पूर्ण बंद केले आहेत. यातील ३० महत्त्वाच्या रस्त्यावर पोलिसांचा २४ तास बंदोबस्त आहे. तरीही एवढय़ा मोठय़ा संख्येने स्थलांतरित येत असल्याबद्दल आश्चर्य  व्यक्त केले जात आहे.

टाळेबंदी, संचारबंदी तथा जिल्हाबंदी असूनही मुंबई, पुण्यासारख्या करोनासाठी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भागातून कोणाही व्यक्तींचा सोलापूर जिल्ह्यात अजिबात शिरकाव होऊ  नये म्हणून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. पोलिसांना लाच देऊ न सोलापुरात अनधिकृतपणे प्रवेश दिला जात असेल, तर त्याबाबत चौकशी करून कारवाई केली जाईल.

– मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 24, 2020 12:45 am

Web Title: infiltration continues from mumbai pune to solapur abn 97

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/infiltration-continues-from-mumbai-pune-to-solapur-abn-97-2140403/