नवी मुंबई लगत असलेल्या महापे आद्योगिक वसाहतीतील एका आय टी कंपनीत काम करणाऱ्या १९ जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे. याचं कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीस करोना झाल्याचे आधी निष्पन्न झाले होते, त्यानंतर त्याच्यासह अन्य सहकाऱ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात १९ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सध्या या सर्वांना नवी मुंबई मनपा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुन्हा एकदा त्यांची चाचणी केली जाणार आहे.
या घटनेने एमआयडीसीतील विशेषतः आय टी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आय टी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू होते. मात्र, हे काम शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन करून सुरू असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याच कंपनीत काम करणाऱ्या आणि कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लक्षण दिसून आल्यावर त्याची तपासणी करण्यात आली, यामध्ये तो करोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर या कंपनीने लगेच त्यांच्या समवेत काम करणाऱ्या सर्वांची करोना चाचणी केली. यामध्ये १९ जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले. या १९ पैकी ७ जण नवी मुंबतील, २ ठाणे तर अन्य मुंबई परिसरात राहणारे आहेत. या घटनेने आता नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णाची संख्या ८० पेक्षा अधिक झाली आहे.
संबंधित आयटी कंपनीतील १९ जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र ही चाचणी थायरोकेअरमध्ये करण्यात आल्याने या सर्वांची चाचणी पुन्हा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांच्या स्वाबचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी मुंबईत पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महादेव पेंढारी यांनी दिली.
[embedded content]
दहा टक्के उपस्थिती आणि बाकीच्यांनी घरी बसून काम करावे असा निर्णय या पूर्वीच घेण्यात आला होता. त्याच अनुषंगाने एमआयडीसीमध्ये विशेषतः आय टी कंपन्याचे काम काम सुरू आहे. हे काम करत असताना पूर्ण काळजी घेण्याची आवाहन करण्यात आले होते. तरीही ही घटना घडल्याने आता उरल्या सुरल्या कंपन्याही काम करावे की नाही या भीतीच्या सावटाखाली आहेत.
First Published on April 22, 2020 2:14 pm
Source: https://www.loksatta.com/mumbai-news/19-people-infected-with-corona-virus-in-a-single-it-company-in-navi-mumbai-aau-85-2138958/