उलट्यांचा त्रास होत असलेल्या वरळीतील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील हॉस्पिटल्समध्ये कोरोनाचे रुग्ण असल्याने नवीन रुग्णासाठी जागा नसल्याचे कारण देत या रुग्णावर उपचार करण्यास रुग्णालयांनी नकार दिल्याने उपचाराअभावी या व्यक्तीचा मृत्यू झाला.
मुंबई : वरळी परिसरातील सेंचुरी वसाहतीत राहणाऱ्या टॅक्सी चालक सुदर्शन रसाळ यांचा आज सकाळी हकनाक बळी गेला. मुंबईतील हॉस्पिटल्समध्ये कोरोना पेशंट भरले असून नवीन पेशंटसाठी जागा नसल्याचे कारण देत सुदर्शन रसाळ यांच्यावर उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे.
सुदर्शन रसाळ हे वरळी परिसरातील सेंचुरी वसाहत येथे राहत होते. टॅक्सी चालवून ते आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना उलट्या आणि छातीत कफ जमण्यास सुरुवात झाली होती. यावर त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. मात्र काल रात्री 9 वाजल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास पुन्हा सुरू झाला. हा त्रास वाढल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या.
सुदर्शन यांचे लहान बंधू अविधन रसाळ हे आपल्या मोठा भाऊ सुदर्शन यांना टॅक्सीमध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी बाहेर पडले. त्यांनी सुरुवातीला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये सुदर्शन यांना दाखल करण्यासाठी आणलं. येथे कोरोनाची टेस्ट केल्यानंतर त्यांना या ठिकाणी ॲडमिट करू शकत नसल्याचं कारण देत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सुदर्शन अॅडमिट करा, असा सल्ला देण्यात आला. यानंतर तिथून बाहेर पडल्यानंतर ते नायर हॉस्पिटलमध्ये आले. तिथेही त्यांना अॅडमिट करून घेऊ शकत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर ते जीटी हॉस्पिटलमध्ये पोचले. येथेही नकार मिळाल्यानंतर ते सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये देखील पोहोचले.
या ठिकाणीही डॉक्टरांनी अॅडमिट करून घेतलं नाही. त्यानंतर ते केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. या हॉस्पिटलमध्ये देखील त्यांना अॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला. हतबल झालेले अविधन रसाळ आपल्या भावाला वाचवण्यासाठी धावाधाव करत होते. त्यानंतर ते फोर्ट इथल्या ENT हॉस्पिटलमध्ये आले तिथेही त्यांच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला. ग्लोबलमध्ये देखील अॅडमिट करून घेण्यास नकार दिल्यानंतर ते पुन्हा केईएम हॉस्पिटलच्या दिशेने आलेत. त्यानंतर ते हिंदुजा हॉस्पिटलमध्ये गेले, त्यानंतर ते नानावटी हॉस्पिटलमध्ये गेले. या दोन्ही हॉस्पिटलमध्ये देखील सुदर्शन यांना अॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला. सर्वच ठिकाणी कोरोना बाधित पेशंट असल्याचे त्यांना सांगण्यात आलं.
अविधन रसाळ हे आपले बंधू सुदर्शन यांना वाचवण्यासाठी रात्री 11 वाजता आपली टॅक्सी घेऊन बाहेर पडले होते. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ते या हॉस्पिटल्सला चकरा मारत होते आणि डॉक्टर्सना विनंती करत होते. मात्र त्यांच्या हाती निराशा पडली. सकाळी 7 वाजता ते सुदर्शन यांना घेऊन परत आपल्या घरी पोहोचलेत आणि अर्ध्या ते पाऊण तासांमध्येच सुदर्शन यांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करावी, अशी मागणी आता सुदर्शन रसाळ यांचे कुटुंबीय करत आहेत.
सुदर्शन रसाळ यांचा मृतदेह नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आलेला आहे. सुदर्शन यांना उलट्या आणि कफ होता, असं त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. वैद्यकीय अहवालानंतरच सुदर्शन यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. मात्र कोरोना व्हायरसचं कारण देऊन आपलं हॉस्पिटल पूर्ण भरले असून नवीन पेशंटसाठी जागा नाही, असं कारण सांगणाऱ्या या हॉस्पिटल्सवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुदर्शन रसाळ यांच्या कुटुंबियांनी केलेली आहे. आज सुदर्शन रसाळ यांचा जरी हकनाक बळी गेला असला, तरी भविष्यात अशा पद्धतीचा एखाद्या पेशंटचा बळी जाऊ नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून यावर उपाययोजना करणं तितकच गरजेचा आहे.
Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/one-patient-dies-due-to-not-got-treatment-in-mumbai-762246