मुंबई बातम्या

अतिथी देवो भव! मुंबई महापालिका धावली एका असहाय्य विदेशी महिलेच्या मदतीला… – Loksatta

संदीप आचार्य
मुंबई: प्राचीन काळापासून भारतीयांनी आवर्जून जपलेली एक परंपरा आहे, ती म्हणजे अतिथी देवो भव… करोना आणि लॉकडाउनमुळे मुंबईत अडकलेली हताश अवस्थेतील एक कोलंबियन महिला सध्या ‘अतिथी देवो भव’ या परंपरेचा अनुभव घेत आहे. घरात करोनाची लढाई सुरू असतानाही या महिलेची संपूर्ण जबाबदारी मुंबई महापालिकेने घेतली आहे. महापालिकेच्या आतिथ्यशीलतेचा हा एक वेगळाच अवतार म्हणावा लागेल.

तिशीतील जेनिफर भारत भ्रमणासाठी २२ फेब्रुवारीला मुंबईत पोहोचली. भारतातील मंदिरे तसेच ताजमहाल तिला पाहायचा होता. मुंबई फिरण्याचीही तीची इच्छा होती. तशी ती कोलंबियावरून एकटीच आली असली तरी दुबईहून तिच्या काही मैत्रिणी येणार होत्या. त्यानंतर सुरु होणार होते भारतभ्रमण… नेमका करोना आडवा आल्यामुळे व पाठोपाठ लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून जेनिफर मुंबईतच अडकून पडली. तिच्या मैत्रिणीही येऊ शकल्या नाहीत. सुरुवातीला एका बऱ्यापैकी हॉटेलमध्ये तिने काही दिवस काढले. हळूहळू पैसे संपू लागले तसे जेनिफरने कोलंबियन दुतावासाशी संपर्क साधला. दुतावासाने सुरुवातीला राहाण्याची व्यवस्था केली मात्र नंतर हात वर केल्याने पोलिसांनी येऊन तिची व्यवस्था १ एप्रिल रोजी अंधेरीतील एका छोट्या हॉटेलात केली.

तेव्हापासून घाबरलेली जेनिफर कधी कोलंबियातील आपल्या घरी मदतीसाठी फोन करत होती तर कधी दुबईतील मैत्रिणींना फोन करत होती, असे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितले.  १ एप्रिलपासून आतापर्यंत अंधेरीतील छोट्या हॉटेलमध्ये राहाणारी जेनफर हताश झाली होती. येथील मसालेदार खाण्याची सवय नसल्यामुळे उपाशी राहाण्याची वेळ आली. त्यातच खिशातील पैसे जवळपास संपलेले होते. लॉकडाउनच्या परिस्थितीत मदत मागणार तरी कोणाकडे आणि करणार तरी कोण हा एक प्रश्नच होता. काय करावे ही जेनिफरला कळत नव्हते.

अचानक चक्रं फिरली. जेनिफर राहात असलेल्या हॉटेलात पालिकेचे अधिकारी व डॉक्टर पोहोचले. त्यांनी तिच्याशी संवाद साधून धीर दिला आणि मदतीची सारी व्यवस्थाही केली. महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या पुढाकाराने हे सारे घडून आल्याचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सकपाळे यांनी सांगितले. एक विदेशी महिला उपाशी राहात असल्याची माहिती कोणीतरी अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्यापर्यंत पोहोचवली तेव्हा मुंबईतील करोनाच्या लढाईत व्यस्त असूनही त्यांनी तात्काळ प्रशांत सकपाळे यांना फोन करून नेमकी काय परिस्थिती आहे याची चौकशी करून त्या महिलेला लागेल ती सर्व मदत करण्यास सांगितले.

मुंबई महापालिकेचे डॉक्टर तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी बरोबर घेऊन जा, असेही काकाणी यांनी आवर्जून सांगितले. त्यानुसार प्रशांत सकपाळे डॉक्टर व परिचाकांसह जेनिफर राहात असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. सुरुवातीला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या तिच्याशी संवादच साधता येत नव्हता. त्यात तिला इंग्रजी येत नव्हते तर तिची भाषा पालिका अधिकारी व डॉक्टरांना कळत नव्हती. पण आलेल्या लोकांची प्रेमाची व आपुलकीची भावना तिला कळली. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संवाद सुरू झाला तेव्हा कळलं की गेल्या काही दिवसांपासून ती जेवलेली नाही. लगेचच तिला ज्युस व काही सँडविच आणून खायला दिले. डॉक्टरांनी तिची तपासणीही केली. तिच्याकडे अवघे एक हजार रुपयेच शिल्लक होते. या पैशात मुंबईतील कोणत्याही हॉटेलमध्ये एक दिवसही राहाता आले नसते. पोलिसांनींच तिला येथे आणून सोडल्यामुळे हॉटेल मालकाने पैशाचा तगादा लावला नव्हता. मात्र भारतीय तिखट जेवण जेवणे तिला शक्य नव्हते व खिशात पैसे नसल्याने बाहेरून काही मागवणेही जमत नव्हते. परिणामी गेल्या तीन दिवसापासून जवळपास उपाशी राहाण्याची वेळ तिच्यावर आली होती.

अधिकाऱ्यांनी ही माहिती सुरेश काकाणी यांना सांगताच त्यांनी जेनिफरची सर्व जबाबदारी पालिका घेईल असे सांगितले. त्यानुसार हॉटेलच्या बिलापासून ते तिची आता अन्यत्र चांगल्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येत आहे. खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली असून रोजच्या व्यस्त वेळेतूनही अधिकाऱ्यांना फोन करून काकाणी माहिती घेत असतात. याबाबत काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, एक परदेशी व्यक्ती त्यातही महिला लॉकडाउनमुळे आपल्या देशात अडकली असल्याने तिची संपूर्ण जबाबदारी ही आपलीच आहे. या महिलेचा कोलंबियात कपड्याचा छोटा व्यवसाय असून तिच्या घरच्यांनी ११ मे रोजीचे परतीचे तिकीट पाठवले होते. मात्र आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने तिकीट रद्द केले आहे. विमानसेवा सुरु होताच आपण मायदेशी जाऊ, असे तिने सांगितले.

या विदेशी महिलेच्या म्हणण्यानुसार कोलंबियन वकिलातीने सुरुवातीला एका हॉटेलात व्यवस्था केला होती मात्र नंतर जबाबदारी न घेतल्याने पोलिसांनी सध्याच्या अंधेरीतील हॉटेलात ठेवले. माझ्या दृष्टीने एक विदेशी महिला करोनाच्या अभूतपूर्व परिस्थिती मुंबईत अडकून पडली आहे व तिला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे महापालिका तिला सर्व मदत करेल, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले. सध्या जेनिफरची रोज पालिका अधिकारी चौकशी करतात तसेच तिच्या खाण्याची योग्य व्यवस्थाही करण्यात आली असून मुंबई महापालिकेने ‘अतिथी देवो भव’चा धर्म खऱ्या अर्थाने जपला आहे.

imageलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 19, 2020 3:49 pm

Web Title: mumbai municipal corporation help foreign women who stuck in mumbai because of lockdown scj 81

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-municipal-corporation-help-foreign-women-who-stuck-in-mumbai-because-of-lockdown-scj-81-2136214/