मुंबई बातम्या

वाधवान यांचा जामीन रद्द करा; ‘ईडी’ची मुंबई उच्च न्यायालयात याचिका – Loksatta

लॉकडाउनच्या काळात गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याचं शिफारस पत्र घेऊन प्रवास करणं डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांच्या अंगलट येण्याची चिन्ह आहेत. जामीनाच्या नियमांचं उल्लंघन करण्याबरोबरच लॉकडाउनच्या काळात प्रवास केल्याप्रकरणी ‘ईडी’नं (अमलबजावणी संचालनालय) मुंबई उच्च न्यायालयात वाधवान यांचा जामीन रद्द करण्यासाठी धाव घेतली आहे.

राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचं प्रकरण समोर आलं होतं. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह २३ जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. राज्य सरकारनं या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

ही घटना घडल्यानंतर ईडीनं वाधवान यांचा जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल असलेले कपिल वाधवान सध्या जामीनावर बाहेर आहेत. या काळात त्यांनी जामीनाच्या अटींचा भंग केला असल्याचा आरोप ईडीनं केला आहे. त्याचबरोबर करोनामुळे लॉकडाउन असताना वाधवान यांनी प्रवास करण्यावर ईडीनं आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ‘ईडी’च्या वकील पुर्णिमा कंठारिया यांनी ही याचिका दाखल केली असून, न्यायामूर्ती पी.डी. नाईक यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर २३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 15, 2020 6:37 pm

Web Title: lockdown ed moves bombay hc seeks cancellation of kapil wadhwans bail bmh 90

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/lockdown-ed-moves-bombay-hc-seeks-cancellation-of-kapil-wadhwans-bail-bmh-90-2132984/