मुंबई बातम्या

करोनाविरोधात मुंबई-पुण्यावर लक्ष – Loksatta

मुंबई-ठाणे-पुणे पट्टय़ात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता राज्य सरकारने मोठय़ा खासगी रुग्णालयांनाही करोनाविरोधी लढय़ात सहभागी करून घेण्यास सुरुवात के ली आहे. त्याचाच भाग म्हणून मुंबईतील प्रमुख खासगी रुग्णालयांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत उपचारपद्धती आणि गंभीर स्थितीमधील रुग्णांना वाचवण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. करोनाचा मुंबई-पुण्यातील आलेख लवकरात लवकर खाली आणण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुंबईतील प्रमुख कॉर्पोरेट रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. यावेळी सैफी, फोर्टिस, वोकहार्ट, हिंदुजा, हिरानंदानी, कोकिळाबेन, सेव्हन हिल्स त्याचप्रमाणे मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सौरव विजय, सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, रामास्वामी, डॉ संजय ओक आदी उपस्थित होते.

करोना लागण झालेल्या रुग्णांची देखभाल, त्यांच्यावरील उपचार हा एकूणच करोना साथीमधील महत्त्वाचा भाग आहे. रुग्णांना लवकर बरे करणे, मृत्यू होऊ न देणे हे सरकार आणि वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हान आहे. महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत उत्तम रुग्ण व्यवस्थापन झाले पाहिजे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. उपचार सुरू असताना रुग्णांची कशा रीतीने काळजी घ्यावी, वैद्यकीय उपकरणांची आवश्यकता, प्रमाणित उपचारपद्धती, आयसीयू बेड्सची उपलब्धता, यावर विस्तृत चर्चा झाली. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे व त्यांना बाधा होऊ नये याकडे लक्ष द्यावे. कोविड उपचारांसाठी जी तीन प्रकारची रुग्णालये निश्चित केली आहेत त्याचे नियोजन व त्यांच्यातील समन्वय व्यवस्थित असणे गरजेचे आहे यावरही चर्चा झाली. चाचणीची संख्या वाढली आहे. तसेच आता लोकांमध्ये जागृती आल्याने लक्षणे दिसताच लोक रुग्णालयांत येण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत आपल्याला करोनाचा आलेख खाली आणायचाच आहे या दृष्टीने या बैठकीत विविध वैद्यकीय मुद्दय़ांवर मुख्यमंत्र्यांनी सूचना ऐकल्या व कार्यवाहीचे निर्देश दिले.

येत्या काही दिवसांत आपल्याला करोनाचा आलेख खाली आणायचाच आहे या दृष्टीने या बैठकीत विविध वैद्यकीय मुद्दय़ांवर मुख्यमंत्र्यांनी सूचना ऐकल्या व कार्यवाहीचे निर्देश दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 16, 2020 1:13 am

Web Title: attention on mumbai pune against coronation abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/attention-on-mumbai-pune-against-coronation-abn-97-2133319/