मुंबई बातम्या

Coronavirus : नवी मुंबईत ४ रुग्णांची वाढ; नेरुळमध्ये एकाचा मृत्यू – Loksatta

नवी मुंबई : नवी मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून रविवारी ४ रुग्णांची भर पडली असून नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्याो ३९ झाली. तर नेरुळ सेक्टर २३ येथील  ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे .   ऐरोली सेक्टर ८ येथील नागरिकाची तसेच ऐरोली दिवागाव येथील नागरिकाला करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच नेरुळ सेक्टर ८ येथील रहिवाशी असलेल्या व मुंबईत डॉक्टर असलेल्याला लागण झाली आहे,तर नेरुळ सेक्टर ३६ येथील एक ज्येष्ठ नागरिक २० मार्चपासून कुटुंबासमवेत सांगली येथे राहत होते. परंतु ९ मार्चला बेलापूर येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांनाही करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्याने या रुग्णास सांगली येथील संपर्कातूनच करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे तपासणीत समोर आले असून सांगली येथेही संपर्कात आलेल्यांना १३ जणांची  तपासणी करण्यात येत आहे.

पनवेल, उरणमध्ये ६ नवे रुग्ण

पनवेल : पनवेलमध्ये २४ तासांत ६ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे  पनवेल व उरण या दोनही तालुक्यांतील करोना रुग्णांचा आकडा २८ वर पोहचला आहे.  कळंबोलीमधील एका महिलेला करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तळोजा फेज १ मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित तरुण हा वार्डबॉयचे काम करत होता. खारघरमधील एक व्यक्ती सिंगापूर येथून प्रवास करून खारघरमध्ये वास्तव्यास होती. २२ दिवसांनी संबंधित व्यक्तीला करोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर त्यांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

वसईत २ तर मीरा-भाईंदरमध्ये ४ नवे रुग्ण

वसई : वसईत रविवारी दोन रुग्णांची भर पडल्याने शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८ झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात चार नवे रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णाची संख्या ३६ एवढी झाली आहे.  नालासोपारा पूर्वेला राहणाऱ्या जसलोक रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला गेल्या आठवडय़ात करोनाची लागण झाली होती. त्याच्या कुटुंबीयांचे तपासणी अहवाल रविवारी आले. त्यात त्याची पत्नी आणि मुलीला करोनाची लागण झाली आहे. मीरा-भाईंदर शहरात रविवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हे रुग्ण मीरा रोड येथील पूजानगर, नयानगर तसेच भाईंदर पूर्वेकडील गोड गाव परिसरातील असून, करोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 13, 2020 2:51 am

Web Title: 4 new coronavirus positive cases in navi mumbai

Source: https://www.loksatta.com/navimumbai-news/4-new-coronavirus-positive-cases-in-navi-mumbai-2130468/