मुंबई बातम्या

मुंबई-पुण्याचा नवरा नको गं बाई – Loksatta

करोना व्हायरस या महामारीमुळे देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. देशभरातील दोनशे जणांचा या महामारीनं बळी घेतला आहे. सर्वाधिक करोनाग्रस्त महाराष्ट्रात असून मुंबई आणि पुण्यातील संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबई आणि पुण्यात रोजंदारासाठी गेलेले सर्व गावखेड्याकडे परतले आहेत. काही गावं तर गजबजली असली तरीही काही ठिकाणी अफवेमुळे भीतीचं वातावरण आहे. फेब्रुवारी संपला की लग्नसराईला सुरूवात होते. पण देशभरात लॉकडाउन असल्यामुले भावी नवरदेवांच्या लग्नावर संक्रात आल्याचं दिसून येते. अनेकांना लॉकडाउनमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागली. तर काहीजण शॉर्टकटमध्ये लग्न उरकत आहेत. इच्छुक नवरदेवांचं मात्र लॉकडाउनमुळे संबंध जोडण्यास अडचणी येत आहेत. लॉकडाउनमुळे वधुवर पक्षाची चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसत असून अनेक भावी नवरदेवांना पुढच्या वर्षीचीच प्रतीक्षा कायम राहणार आहे. गावखेड्यात पूर्वी नोकरदार किंवा मुंबई-पुण्यात कामाला असणाऱ्या नवरदेवांना प्राधान्य दिलं जात असायचं. मात्र, आता करोना व्हायरसमुळे घरांघरांत मुंबई-पुण्याचा नवरा नको गं बाई अशा चर्चा सुरू आहेत.

लॉकडाउनमुळे दळणवळण बंद झाल्याने नवरा-नवरी पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ थांबली आहे. कांदापोह्याच्या (मुलगा-मुलगी पाहण्याचा कार्यक्रम) कार्यक्रमाला ब्रेक लागला आहे. ज्यांची लग्न जमली आहेत त्यांच्या तारखा पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही. नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलली जात आहेत. मात्र खरी पंचायत होतेय ती भावी लग्नालायक तरुण-तरूणींची, कारण त्यांना धड लग्न जुडविण्यासाठी चान्स नसल्याने व मुलगी पाहायलाही जाता येणार नसल्याने नवीन होण्याऱ्या संबंधावर सावट पसरल्याचे दिसतेय.

गेल्या काही वर्षांपासून शेतकरी नवरा नको ग बाई. नोकरदार हवा, पुण्या-मुंबईचा हवा असं लोण ग्रामीण भागांत होते. कंपनीमध्ये काम करून दोन वेळची भाकरी जरी कमवली तरी चालेल. पण शेतकऱ्यांना ग्रामीण भागांतील नवरदेवाला मुलगी द्यायची नाही, असा विचार ग्रामीण भागांतील लोकांमध्ये होता. मात्र, सध्या करोना व्हायरसच्या महामारीमुळे लोकांचे विचारच बदलले आहे. सध्या ग्रामीण भागांमध्ये मुंबई-पुण्याहून आलेल्यांना घरात घेण्यासाठी पण हजारवेळा विचर करत आहेत. काहीजण तर दारातूनच माघारी झाडत आहेत. ‘मुंबई-पुण्याचा नवरा नको गं बाई, इथलाच जवळचा पाहूयात. पोरगी आपल्या डोळ्यांसमोर राहील. भविष्यात ग्रामीण भागामध्ये नवरीची आई असं नक्कीचं म्हणेल अशी परिस्थिती सध्या आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on April 10, 2020 11:07 am

Web Title: dont want a husband in mumbai pune due to corona virus nck 90

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/dont-want-a-husband-in-mumbai-pune-due-to-corona-virus-nck-90-2128430/