मुंबई बातम्या

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, ‘क्वॉरन्टाईन’ व्यक्तींवर ठेवणार लक्ष – मुंबई लाइव्ह

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वॉरन्टाईन केलेल्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, त्यांनी घरातच थांबावे, असं आवाहन सरकारडून केलं असतानाही काही क्वॉरन्टाईन केलेले नागरिक समाजात फिरत असल्याचं निदर्शानास आलं आहे. त्यामुळं आता या क्वॉरन्टाईन केलेल्या व्यक्तींचा त्यासोबतच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींवर नजर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं यावर उपाय काढण्यासाठी आयआयटी बॉम्बे पुढे सरसावली आहे. आयआयटी बॉम्बेच्या प्राध्यापकांच्या टीमनं ‘क्वॉरन्टाईन’ नावाच्या अॅपची निर्मिती केली असून, या साहाय्यानं संबंधित अधीकृत यंत्रणेला क्वॉरन्टाईन केलेली व्यक्ती नेमकी कोणत्या परिसरात आहे? ती व्यक्ती त्याला नेमून दिलेल्या परिसरातच आहे की इतरत्र कुठे? याची माहिती मिळू शकणार आहे.

राज्यातील जी लोक कोरोनानं बाधित नाहीत त्यांना अलर्ट देण्यासाठी हे अॅप जास्त उपयुक्त ठरणार आहे. त्यांना आपण क्वॉरन्टाईन लोकांच्या संपर्कात आलो याची माहिती मिळणार असल्यानं ते जास्त सतर्क राहू शकणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक बाधित रुग्ण त्यांना क्वॉरन्टाईन केलेले असतानाही नियमांचा भंग करून इतरांचं आरोग्य धोक्यात घालतानाच्या अनेक घटना समोर आल्या असून, त्यांच्या जीवाला यामुळं धोका आहे.

आयआयटी बॉम्बेचे मंजेश हनवल, गणेश रामकृष्णन, यांनी या ऍपची निर्मिती केली आहे. या अॅपसाठी त्यांना आयआयटीचे माजी विद्यार्थी अस्विन गमी आणि पीएचडी स्कॉलर आयुष्य महेश्वरी, अधिकारी अर्जुन साबळे यांचीही मदत मिळाली आहे. तसंच, आयआयटी बॉम्बेच्या प्राचार्य भास्करन रमण आणि कामेश्वरी छेब्रॉलू यांनी मिळून आणखी एक सेफ नावाचे अॅप्लिकेशन तयार केले आहे, जे क्वारंटाईन व्यक्ती त्यांना घालून दिलेल्या नियमांचे पालन किंवा मर्यादा पाळतात की नाही यावर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे.

आयआयटी बॉम्बेच्या या दोन्ही अॅप्लिकेशन्सची माहिती या संस्थेकडून आणि संबंधित डिपार्टमेंटकडून महानगरपालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आयआयटी बॉम्बेकडून देण्यात आली आहे. ती मिळाल्यानंतर याचा वापर सुरु करण्यात येऊन लोकांच्या उपयोगात आणता येणार आहे.

असं वापरलं जाणार अॅप

  • हे अॅप क्वॉरन्टाईन व्यक्तीच्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या मोबाईल फोनवर अधिकृत यंत्रणेद्वारे इनस्टॉल करून घेता येणार आहे. 
  • हे अॅप इनस्टॉल केल्यानंतर यामध्ये वेळोवेळी जीपीएस सूचना येत राहणार आहेत. 
  • संबंधित क्वॉरन्टाईन व्यक्तीने त्याला नियोजित परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास याचा अलर्ट तात्काळ प्रशासनाला मिळेल.
  • संबंधिताला बाहेर समाजात जाण्यापासून वेळीच रोखता येऊ शकणार आहे.
  • प्रशासनाला यामुळे क्वारंटाईन व्यक्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ही यंत्रणा उपयोगाची ठरणार आहे. 
  • प्रशासनाकडून हे ऑपरेट केले जाणार आहे
  • या अॅपचा लॉग इन आयडी, पासवर्ड प्रशासनांकडं असणार आहे.

हेही वाचा –

अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पास

कोरोनाचं संकट टळेपर्यंत दादरचं भाजी मार्केट बंद


Source: https://www.mumbailive.com/mr/civic/corona-virus-iit-bombay-students-created-an-app-47406