मुंबई बातम्या

CoronaVirus : मुंबईत करोनाचा आणखी एक बळी; ४० वर्षीय महिलेचा मृत्यू – Loksatta

मुंबईत रविवारी करोनानं आणखी एक बळी घेतला. करोनाचा संसर्ग झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महिलेला करोनासदृश्य लक्षण आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. त्यानंतर करोना तपासणीत महिलेला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, करोनामुळे मुंबईत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात दिवसेंदिवस करोना संसर्गांचा आकडा वाढत असताना मृतांची संख्येतही धिम्या गतीनं वाढू लागली आहे. यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यु झालेल्या मुंबईत रविवारी आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं यासंदर्भातील माहिती दिली.

करोनामुळे एका ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचं जारी करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या महिलेला शनिवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेला उच्च रक्तदाबासह श्वास घ्यायला त्रास जाणवत होता. त्यानंतर तिला रुग्णालयात आणण्यात आलं. या महिलेची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यात करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. रविवारी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेवर शनिवारी रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, महापालिकेनं ही माहिती मुद्दाम लपवून ठेवली असा आरोप केला जात आहे. तसेच या घटनेनंतर केईएम रुग्णालयाचा अपघात विभाग अद्याप सुरू असून, विभागातील ४० डॉक्टर आणि परिचारिकांना वेगळं राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अकरा वर्षाच्या मुलीला लागण

नागपूरच्या दिल्ली प्रवासाचा इतिहास असलेल्या एका व्यावसायिकाला करोना असल्याचे २६ मार्चला पुढे आले होते. त्यानंतर २७ मार्चला त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, आईसह त्याच्या एका कर्मचाऱ्याला करोना असल्याचे स्पष्ट झाले. पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलीसह या व्यावसायिकांच्या संपर्कातील इतर एका नातेवाईकाला २८ मार्चला करोना असल्याचे निदान झाले. या नातेवाईकाच्या ११ वर्षीय मुलीलाही करोनाची बाधा झाल्याचे रविवारी पुढे आले आहे. या सर्व रूग्णांवर आता नागपुरातील मेयो रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

imageलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 29, 2020 1:04 pm

Web Title: coronavirus in maharashtra one women passes away in mumbai after infected coronavirus bmh 90

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-in-maharashtra-one-women-passes-away-in-mumbai-after-infected-coronavirus-bmh-90-2118889/