मुंबई बातम्या

करोनाच्या भीतीने मुंबई ते वाराणसी दुचाकीने प्रवास; थेट रुग्णालयात भरती – Maharashtra Times

करोनाच्या भीतीने मुंबई ते वाराणसी दुचाकीने प्रवास; थेट रुग्णालयात भरती
वाराणसी : करोना व्हायरसचा धोका पाहता सध्या प्रत्येक जण प्रचंड काळजी घेत आहे. ट्रेन, बस आणि विमानाची वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे. त्यामुळे शहरातून गावाकडे जाण्यासाठी निघालेल्या प्रत्येकाची अडचण झाली आहे. अशातच एक तरुण मुंबईहून उत्तर प्रदेशातील वाराणसीला दुचाकीवर गेला. वाराणसीत पोहोचताच या तरुणाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास सुरू झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई ते वाराणसी हे अंतर रस्ते मार्गाने जवळपास १५०० किमी आहे.

…. म्हणून मोदींनी घेतला लॉकडाऊनचा निर्णय

वाराणसी शहरापासून दूर असलेल्या गंगापूर भागातील शेख शमीम मुंबईतील एका खाजगी कंपनीत नोकरी करतो. मुंबईमध्ये करोना प्रादुर्भावाचा धोका वाढता कार्यालये बंद करण्यात आली असून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. परिस्थिती आणखी बिघडण्याच्या भीतीने शेख शमीमने ट्रेनचं तिकीट बूक केलं. पण ऐनवेळेला सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्याने मोठी अडचण निर्माण झाली.

भोपाळ: पत्रकाराच्या मुलीला करोना, कमलनाथ अडचणीत?

घरी कसं पोहोचायचं यावर विचार सुरू झाला. मित्राने सल्ला दिल्यानुसार वाराणसीला दुचाकीवर जाण्याचा निर्णय शेख शमीमने घेतला. दोघेही मित्र दुचाकीवरुन वाराणसीसाठी रवाना झाले. तीन दिवस प्रवास केल्यानंतर शेख शमीम त्याच्या गावात पोहोचला. पण घरी जाताच त्याची प्रकृती बिघडली. ग्रामस्थांनी याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

देशात २१ दिवस लॉकडाऊन


देशात सध्या १ लाख ८७ हजार ९०४ जण कॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहेत. सामुदायिक संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरात राहणे हाच मार्ग असल्याने केंद्र सरकारने पूर्णपणे लॉकडाऊन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना याची घोषणा केली. १४ एप्रिलपर्यंत केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/youth-who-reached-reached-home-mumbai-to-varanasi-admitted-in-hospital/articleshow/74810031.cms