मुंबई बातम्या

मुंबई पालिकेने कंबर कसली; संशयितांची घरी येऊन चाचणी सुरू – Maharashtra Times

मुंबई पालिकेने कंबर कसली; संशयितांची घरी येऊन चाचणी सुरू
मुंबई: करोना आजार धोकादायक असला तरी घाबरून जावू नका. करोनाची लक्षणं असलेल्यांची त्यांच्या घरीच चाचणी करण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे. त्यासाठी पालिकेने पाच खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा उपलब्ध करून दिल्या असून या प्रयोगशाळेतील तज्ज्ञ घरी येऊन संशयित रुग्णांची करोना तपासणी करत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात मुंबईकरांची ससेहोलपट होणार नाही.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून पालिकेने मुंबईतील नागरिकांना करोना चाचणीसाठी पाच खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे नागरिक या प्रयोगशाळांची संपर्क साधून व तेथील तज्ज्ञांना आपल्या घरी बोलावून चाचणी करवून घेऊ शकणार आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांना जास्तीत जास्त रुपये साडेचार हजार एवढे शुल्क एका चाचणीसाठी आकारता येणार आहे.

या पाच खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांशी साधा संपर्क:


>> सबर्बन डायग्नोस्टिक्स : ०२२-६१७०-००१९

>> थायरोकेअर : ९७०२-४६६-३३३

>> मेट्रोपोलीस: ८४२२-८०१-८०१

>> सर एच एन‌ रिलायन्स : ९८२०-०४३-९६६

एसआरएल लॅब :

>> ही चाचणी करण्यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांचे चाचणीसाठीचे शिफारसपत्र (Prescription) असणे आवश्यक आहे. हे पत्र नागरिकांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांकडून घेता येईल.

>> ज्या व्यक्तींना दमा, श्वसनाचे आजार, निमोनिया, ताप, थंडी, खोकला यासारख्या बाबी आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी करवून घेण्यास हरकत नाही.

करोनाच्या भीतीने सलमान, विराटने मुंबई सोडली

१२०० हून अधिक संशयितांशी पालिकेचा संवाद

‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्या सुमारे १ हज़ार २०० संशयित रुग्णांशी पालिकेच्या ४० डॉक्टरांनी संवाद साधून त्यांची सद्यस्थिती जाणून घेतली आहे. या दूरध्वनी संवादादरम्यान ज्या रुग्णांमध्ये सकृतदर्शनी लक्षणे जाणवून आली, अशा ७ संशयित व्यक्तींना खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतून तातडीने करोना चाचणी करवून घेण्याचे निर्देश देण्यात आले. महापालिकेचे डॉक्टर या सर्व व्यक्तींच्या नियमितपणे संपर्कात आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

अमेरिकेत करोनाचा फैलाव; एक हजार मृत्यू

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/five-private-labs-start-coronavirus-tests-in-mumbai/articleshow/74826704.cms