मुंबई बातम्या

मुंबई बाग आंदोलनात राडा – Maharashtra Times

– निवृत्त एसीपीसह पाच जणांवर गुन्हा

– महिलांचा विनययभंग केल्याचा आरोप

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

नवी दिल्लीतील शाहीन बागच्या धर्तीवर मुंबईतील नागपाडा येथे नागरिक सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात फूट पडली आहे. आंदोलन सुरू ठेवण्यावरून शुक्रवारी दोन गटात राडा झाला. महिलांना धक्काबुकी आणि विनयभंग केल्याच्या आरोपावरून नागपाडा पोलिस ठाण्यात निवृत्त एसीपीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपाडा येथील मॉर्डेल रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात महिलांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. रस्ता अडविल्याप्रकरणी या आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले. तरीही महिला आंदोलनावर ठाम आहेत. त्यातच करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंदोलने, सभा, समारंभ यावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई बाग आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांना पोलिसांमार्फत वारंवार हे आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितले जात आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंदोलन मागे घ्यावे का? याबाबत निर्णय घेण्यासाठी मॉर्डेल रोडवर बैठक घेण्यात आली. या बैठकीला आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांच्या नेत्यांचा समावेश होता. निवृत्त एसीपीच्या गटाने आंदोलन कायम ठेवण्याचा पवित्रा घेतला तर इतरांनी हे आंदोलन मागे घेण्याचे मत मांडले. यावरून दोन्ही गटांत वादावादी आणि नंतर धक्काबुक्की झाली. यावेळी निवृत्त एसीपी आणि त्याच्या कार्यकर्ते महिलांच्या अंगावर धावून गेले. यामुळे नागपाड्यात प्रचंड तणाव निर्माण झाला.

आंदोलनात सहभागी झालेल्या काही महिलांनी निवृत्त एसीपी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी विनयभंग केल्याचा आरोप केला. यावरून नागपाडा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. निवृत्त एसीपीसह एका माजी आमदाराला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/play-in-mumbai-garden-movement/articleshow/74751463.cms