मुंबई बातम्या

Coronavirus : मुंबईतील दुकानेही दिवसाआड बंद – Loksatta

दादरसारख्या बाजारपेठांतील गर्दी कमी होणार

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबईत ५० टक्के दुकाने दिवसाआड बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी आपल्या विभागातील रस्त्यांची निवड करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.

पालिका आयुक्तांच्या या आदेशाच्या पार्श्वभूमीवर जी-नॉर्थचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दादर, माहीम आणि धारावीतील रस्त्यांची निवड करून त्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे दादरसारख्या सतत गजबलेली बाजारपेठेतील गुरुवारपासून कमी होण्याची शक्यता आहे.

गर्दीची ठिकाणे, बाजार परिसरात या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. एखाद्या परिसरात आज दुकाने बंद असली तर दुसऱ्या दिवशी या परिसराच्या पुढच्या भागातील दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.

दादर पूर्वमधील न. चि. केळकर मार्ग (पूर्व आणि पश्चिम दिशेने), डिसिल्वा मार्ग, छबिलदास मार्ग, एस. के. बोले मार्ग (उत्तर आणि दक्षिण दिशेने), सेनापाती बापट मार्ग (कोहिनर टेक, इन्स्टिटय़ूट ते हॉकर्स प्लाझा), एम. सी. जावळे मार्ग ते भवानी शंकर पालिका शाळा, एम. जी. रानडे मार्ग,  यांचा समावेश आहे. माहीमधील टी. एस. कटारिया मार्ग (दक्षिण दिशेने गंगा विहार हॉटेल ते शोभा हॉटेल), एल. जे. मार्ग (दर्गा गल्ली), तर धारावीतील ९० फूट मार्ग (पश्चिम दिशा)(६० फूट रोड ते संत रोहिदास मार्ग), आंध व्हॅली मार्ग (पूर्व आणि पश्चिम दिशेने), एम. जी. मार्ग (उत्तर आणि दक्षिण दिशेने) या मार्गाचा समावेश आहे.

झवेरी बाजार आणि एम.जे. मार्केट चार दिवस बंद

मुंबई : करोनाच्या धास्तीमुळे झवेरी बाजार आणि एम.जे. कापड मार्केट चार दिवस बंद ठेवले जाणार आहेत. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या दोन्ही बाजारांतील व्यावसायिकांच्या संघटनेने बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १९ ते २२ मार्च या कालावधीत सर्व दुकाने बंद ठेवली जाणार असल्याचे असोसिएशनने जाहीर केले आहे. बंद काळात बाजारातील साफसफाई आणि र्निजतुकीकरणाचे काम केले जाणार असल्याचे एम. जे. मार्केटने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 19, 2020 4:51 am

Web Title: coronavirus outbreak mumbai to close shops on alternate days zws 70

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/coronavirus-outbreak-mumbai-to-close-shops-on-alternate-days-zws-70-2110843/