मुंबई बातम्या

Coronavirus | मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना 20 मार्चपर्यंत हॉस्टेल रिकामे करण्याचे आदेश – ABP Majha

जे विद्यार्थी परदेशात राहतात किंवा ज्या विद्यार्थ्याना इमर्जन्सी कारणामुळे आपल्या मूळ गावी परतणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित डीनची परवानगी घेऊन होस्टेलमध्ये राहता येणार आहे.

मुंबई  : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  आयआयटी मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांना येत्या 72 तासांत म्हणजेच 20 मार्चपर्यंत वसतिगृहे खाली करण्याचे निर्देश संचालक सुभाषिश चौधरी यांच्याकडून देण्यात आले आहेत. आयआयटी बॉम्बेकडून याआधी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सूचनांनुसार  आयआयटी मुंबईतील क्लासेस, सेंट्रल लायब्ररी सारख्या सुविधा आणि प्रयोगशाळा या आधीच बंद करण्यात आल्या आहेत. मात्र राज्य आणि देशांतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगळवारी आयआयटी मुंबईतील विभागप्रमुख आणि प्रशासकीय प्रमुखांची तातडीची बैठक घेऊन येत्या 72 तासांत आयआयटीमधील येण्या जाण्यावर कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जे विद्यार्थी परदेशात राहतात किंवा ज्या विद्यार्थ्याना इमर्जन्सी कारणामुळे आपल्या मूळ गावी परतणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांनी संबंधित डीनची  परवानगी घेऊन होस्टेलमध्ये राहता येणार आहे. येत्या काही दिवसांत आयआयटीमधील खानावळ बंद करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी विशेष परवानगी घेतल्यास मर्यादित व्यवस्था करता येणे शक्य असल्याचे चौधरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आयआयटी कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डस कर्मचारी वर्गाला सुद्धा खबरदारी म्हणून मास्क आणि हँड ग्लोव्हज घालण्यास सांगण्यात आलाय. शिवाय, पुढील आदेश हे मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मेल द्वारे कळविण्यात येणार आहे.

दरम्यान  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आयआयटीने प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून 29 मार्चपर्यंत सर्व विभागाचे वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालयाना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता मुंबई आयआयटीकडून सर्व विद्यार्थ्यांना ई मेलद्वारे 29 मार्चपर्यंत वर्ग तसेच प्रयोगशाळा बंद ठेवणार असल्याचे सांगितले आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना 29 मार्चपर्यंत आपल्या घरी जायचे असल्यास त्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे.

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/coronavirus-iit-bombay-order-student-to-vacate-hostel-within-20th-march-751597