मुंबई बातम्या

मुंबई पालिकेतील कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी तात्पुरती स्थगित – Loksatta

महाराष्ट्रामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी सुरू केलेला बायोमेट्रिक प्रणालीचा वापर ३१ मार्च २०२० पर्यंत तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बहुसंख्य खासगी कंपन्यांनी यापूर्वीच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक प्रणाली बंद केली आहे.

या काळात मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंदवही परिरक्षित करण्यात येणार आहे. नोंदवहीतील नोंद मानव संसाधन कार्यप्रणालीत नोंदविण्यात येणार आहे. मानव संसाधन कार्यप्रणालीतील नोंदविलेली हजेरी आस्थापनाप्रमुखांनी १३ एप्रिलपर्यंत मंजूर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मंजुरी नसलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदी अनुपस्थिती समजण्यात येणार असून त्यांचे वेतन रोखण्यात येणार आहे.

राणीची बाग पर्यटकांसाठी बंद

राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणीची बाग) १५ मार्च २०२० पासून नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत राणीची बाग बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी राणीच्या बागेत येऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 16, 2020 12:58 am

Web Title: biometric attendance of mumbai municipal staff temporarily suspended abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/biometric-attendance-of-mumbai-municipal-staff-temporarily-suspended-abn-97-2108011/