मुंबई बातम्या

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘कलम 144’ लागू, सामूहिक पर्यटनाला बंदी – TV9 Marathi

मुंबई : कोरोना व्हायरस महाराष्ट्रात हातपाय पसरु लागल्यानंतर आर्थिक राजधानी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईतून राज्यात, देशात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारचे सामूहिक पर्यटन आयोजित करता येणार नाही. (Corona Mumbai Section 144 Imposed)

जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी ‘कोविड 19’ अर्थात ‘कोरोना व्हायरस’चा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत कोणत्याही टूर ऑपरेटर्सना मुंबईतून खाजगी किंवा व्यावसायिक पर्यटनाचे आयोजन करता येणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी काढलेले आदेश न पाळल्यास कलम 144 (जमावबंदी कायद्यानुसार) जी कारवाई केली जाते, ती (अटक) करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 31 मार्चला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांचे आदेश लागू असतील.

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे, तर महाराष्ट्रात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा रोखण्यासाठी खबरदारीसाठी पोलिस प्रशासनाने ही काळजी घेतली आहे.

खाजगी टूर ऑपरेटर्ससह कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगण्यात आलं आहे.

‘कलम 144’ म्हणजे जमावबंदी हा संबंध जोडला जात असला, तरी यावेळी आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीसाठी हे कलम लागू करण्यात आले आहे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, काळजी घ्यावी, सार्वजनिक जागी किंवा समारंभात जाणे टाळावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहं, नाट्यगृहं, स्विमिंग पूल, जिम 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे आवाहनाला प्रतिसाद देत घरी राहणं पसंत केलं आहे. त्यामुळे वीकेंडलाही रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1
  • औरंगाबाद – 1

(Corona Scare Mumbai Section 144 Imposed)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • एकूण – 32 कोरोनाबाधित रुग्ण

Corona Mumbai Section 144 Imposed

कमेंट करा

Source: https://www.tv9marathi.com/mumbai/corona-scare-mumbai-section-144-imposed-194297.html