मुंबई बातम्या

#COVID19 : मुंबई आणि ठाण्यात आणखी एक रुग्ण! – Sakal

मुंबई : मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महामुंबईतील कोरोना बाधितांची संख्या चार झाली असून राज्यातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. गुरुवारी (ता. 12) आढळलेली कोरोनाबाधित 64 वर्षांची व्यक्ती असून ती दुबई येथून मुंबईत आली होती; तर फ्रान्सहून ठाण्यात आलेल्या एका व्यक्तीलाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

कोरोनापासून नागरिकांच्या बचावासाठी नवी मुंबई महापालिकेने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

मुंबईत बुधवारी (ता. 11) कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. यासाठी वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांत या पथकाकडून 106 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले; मात्र त्यात एकाही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळळी नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले. यापूर्वी ज्या परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यांच्या परिसरातील नागरिकांचा पालिकेने शोध घेतला असून बाधितांच्या घरातील तीन लोकांचे त्यांच्या घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. 

18 जानेवारीपासून गुरुवारपर्यंत मुंबई विमानतळावर एक लाख 96 हजार 762 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 190 संशयित प्रवाशांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 168 प्रवासी कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले आहे; तर 20 जणांचा अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत 652 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. 

मेट्रो- 4 मार्गिकेचे काम ”या” कारणामुळे थंडावले!

बाधितांचे निकटवर्तीयही रुग्णालयात 
मुंबईत काल आढळलेल्या दोन कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. यातील तीन जणांना पालिकेच्या कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या सोयीसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून “1916′ या क्रमांकावर ती 24 तास सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर ठाणे येथील रुग्णाच्या कुटूंबियांनादेखिल कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
— 
ठाण्यात 34 जण निगराणीखाली 
ठाणे (बातमीदार) ः कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून परदेशातून आलेल्या नागरिकांची विमानतळावर तपासणी करण्यासह त्यांना 14 दिवस निगराणीखाली ठेवले जात आहे. फ्रान्स, चीन, इटली, दुबई तसेच इतर देशांतून ठाणे जिल्ह्यात आलेल्या 56 जणांपैकी 34 नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यातील 22 जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिली. 
 

Source: https://www.esakal.com/mumbai/another-corona-patient-mumbai-and-thane-269853