मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाचेही १४० कोटी रुपये येस बँकेत! सिनेटमध्ये गदारोळ – Maharashtra Times

मुंबई विद्यापीठाचेही १४० कोटी रुपये येस बँकेत! सिनेटमध्ये गदारोळ
मुंबई:

येस बँक आर्थिक अडचणीत आल्याने बँकेच्या सर्वच ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यातच मुंबई विद्यापीठासारख्या शासकीय आस्थापनाचेही तब्बल १४० कोटी रुपये येस बँकेत अडकले असल्याची बाब समोर आली आहे. या मुद्द्यावरून आज शुक्रवारी विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय सिनेटमध्ये एकच गदारोळ उडाला.

युवा सेनेच्या सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. विद्यापीठाने मुदत ठेवींसाठी राष्ट्रीयीकृत बँकांऐवजी खासगी बँकेचा पर्याय का निवडला असा करंडे यांनी उपस्थित केला. त्यावर विद्यापीठ प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले. विद्यापीठाच्या वित्त अधिकारी माधवी इंगोले यांनी सभागृहाला माहिती दिली की २०१८ मध्ये व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय झाला की विद्यापीठाच्या मुदत ठेवी खासगी बँकेत ठेवाव्यात. त्यानुसार येस बँकेचा पर्याय निवडण्यात आला.

सदस्यांचे या उत्तराने समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

काय आहे येस बँकेच्या आर्थिक डबघाईचे प्रकरण?

आपल्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत प्रमुख खासगी बँकांच्या पंगतीत जाऊन बसलेली येस बँक आर्थिक गर्तेत गेली आणि तिच्या ग्राहकांमध्ये घबराट पसरली. खातेदार, ठेवीदार, कर्जदार (ऋणको), गुंतवणूकदार अशा विविध स्वरूपात हे ग्राहक आहेत. या सर्वसामान्य ग्राहकांना ३ एप्रिलपर्यंत ५० हजार रुपये रक्कमच येस बँकेच्या खात्यातून काढता येईल. मात्र सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही सरकार व रिझर्व्ह बँक (आरबीआय) सातत्याने देत आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांचे आता ऑनलाइन साक्षांकन

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा टॅबवर

COVID-19: महारोगराई म्हणजे काय?

नोकरी शोधण्यासाठी वर्षातले कुठले महिने बेस्ट?

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/mumbai-university-senate-varsity-deposited-140-crore-rupees-as-term-deposites-in-yes-bank/articleshow/74608498.cms