मुंबई बातम्या

‘मुंबई आय’ वांद्रे रेक्लेमेशनलाच – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांनाही ८०० फूट उंचीवरून मुंबईचे दर्शन व्हावे यासाठी ‘मुंबई आय’ची निर्मिती केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या जागा निश्चितीबाबत तिढा निर्माण झाला असून, सदर प्रकल्प वांद्रे रेक्लेमेशन येथील निश्चित ठिकाणीच करण्याबाबत एमएमआरडीए प्रशासन ठाम असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते आहे. तर, प्रकल्पासाठीची प्रस्तावित जागा अपुरी असल्याचे इच्छुक निविदाकारांचे म्हणणे आहे.

पर्यटन आणि महसूलनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘मुंबई आय’ प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ६ मार्चपर्यंत निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही मुदत १५ दिवसांनी वाढवण्यात आल्याचे कळते आहे. मात्र मूळ मुदतीपर्यंत नेमक्या किती निविदा आल्या याबाबत अधिकारीवर्ग बोलणे टाळत असून अधिकाधिक सहभागासाठी ही मुदत वाढवल्याचे जुजबी उत्तर ते देत आहेत. या प्रकल्पासाठीची वांद्रे सी-लिंक टोल नाक्याजवळील प्रस्तावित एक एकर जागा अपुरी पडत असल्याचे मत निविदाकारांनी महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत मांडले होते. मात्र जागा बदलण्याबाबत एमएमआरडीए अनुत्सुक असल्याने निविदाकार पुढे येत नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याच बैठकीत वांद्रे सी-लिंक येथे वाहतूककोंडी होण्याची शक्यता, जागेअभावी पार्किंग वा इतर सुविधा पुरवण्यात असमर्थता या हरकतीही मांडण्यात आल्या. मात्र त्याबाबतही निविदा आल्यानंतर निर्णय घेण्याचे ठरले. तसेच परदेशातून येणाऱ्या यंत्रसामग्रीवर आयात करण्यासाठी सवलत मिळण्याची मागणीही करण्यात आली होती. यावेळी रिलायन्स, एल अँड टी, प्रकाश अम्युझमेंट, एस्सेलवर्ल्ड यांसह आठ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

हा प्रकल्प २००६ मध्ये पालिकेकडे प्रस्तावित होता. मात्र पालिकेने या प्रकल्पात स्वारस्य न दाखवल्याने तो अद्याप रखडला होता. नवे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पाची पुनर्घोषणा करत ‘मुंबई आय’ प्रकल्प पुन्हा उजेडात आणला. मात्र एमएमआरडीएचा निश्चय आणि निविदाकारांच्या मागण्या या चक्रव्यूहात हा प्रकल्प अडकल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत. निविदाकारांच्या इतर मागण्यांबाबत आम्ही विचाराधीन असून आता नव्या मुदतीनंतर येणाऱ्या निविदांमधून या प्रकल्पाची अंतिम रूपरेषा ठरवण्यात येणार असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-eye-bandra-reclamation-only/articleshow/74599560.cms