मुंबई बातम्या

मुंबईत दोन करोना रुग्ण – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

पुण्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व सध्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शहरातील दोघांना करोनाची लागण झाल्याचे बुधवारी समोर आले आहे. पुण्यातील करोनाग्रस्तांच्या संख्येतही वाढ झाली असून, बुधवारी आणखी तिघांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने पुण्यातील रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. तर, महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या १० झाली आहे.

दुबईहून आलेल्या पुण्यातील दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत प्रवास केलेल्या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा सरकारी यंत्रणांकडून शोध घेण्यात आला. त्यांच्यासोबत प्रवास केलेल्या सहा जणांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यांच्या चाचणीचा अहवाल बुधवारी आला व यापैकी दोघांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुरेश काकणी यांनी दिली. या रुग्णांना ‘कस्तुरबा’मध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या रुग्णांच्या कुटुंबातील प्रत्येकाची माहिती घेण्यात येत असून, त्यांचीही चाचणी घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची विमानतळावर तपासणी होत आहे. त्यातही सर्वाधिक बाधित १२ देशांतून येणाऱ्या प्रवाशांची यादी पाठपुराव्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाला दररोज देण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण ६३५ प्रवाशांपैकी ३७० प्रवाशांच्या प्रकृतीवर १४ दिवस लक्ष ठेवण्यात आले. कोरोना प्रतिबंधासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी लवकरच मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमण्यात येणार आहे.

पुण्यात ४३ जणांचे घरातच विलगीकरण

करोनाबाधा झाल्याचे बुधवारी निष्पन्न झालेल्या पुण्यातील तीन जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. पुण्यातील दाम्पत्यासह पाच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांना त्यांच्या घरातच स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर पालिकेचे कर्मचारी, अधिकारी देखरेख ठेवून आहेत.

कर्नाटकातील संशयिताचा मृत्यू

सौदी अरेबियातून परतलेल्या व करोनाची लक्षणे दिसल्याने रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका ७६वर्षीय करोना संशयित रुग्णाचा बुधवारी मृत्यू ओढवला. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप त्याचा अहवाल आलेला नाही.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/two-coronary-patients-in-mumbai/articleshow/74583578.cms