करोना संसर्गाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष आणि अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्यासह आता खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यात येणार आहे. खासगी, सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांच्या सहकार्याने एकूण ४०० खाटांची गरज पडल्यास उपलब्धता ठेवण्यात येणार आहे.
कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या १३ जणांचे करोनासाठीचे नमुने निगेटिव्ह आले असून रविवारी चार संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. या चार रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल आज, सोमवारी मिळणार आहे. मुंबईमध्ये अद्याप एकही करोना रुग्ण आढळला नसल्याने कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी केले आहे.
सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये जागेची उपलब्धता असल्याने या ठिकाणी संशयित रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करणे शक्य आहे. संसर्गित प्रदेशामध्ये प्रवास करून आलेल्या रुग्णांना याठिकाणी दाखल करून काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. दिल्ली येथे झालेल्या कार्यशाळेमध्ये करोनाच्या संसर्गासाठी कशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात, संसर्गित झालेल्या रुग्णांची वैद्यकीय काळजी कशी घ्यावी यासाठी पालिकेने रविवारी खासगी तसेच पालिका रुग्णालयांतील वैद्यकीय तज्ज्ञांना प्रशिक्षण दिले. चार उपनगरीय रुग्णालये, पाच सरकारी, बारा निमसरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश विलगीकरण कक्षासाठी करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयासह रेल्वे रुग्णालयाचाही समावेश असणार आहे. रविवारी पालिकेचे २३ वैद्यकीय अधीक्षक आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. आज, सोमवारीही दोन गटांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.
२५८ रुग्णांना घरी सोडले
राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या १५ जण निरीक्षणाखाली असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही संशयित रुग्ण आढळून आला नसून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध माध्यमांतून जनप्रबोधन करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. मुंबई आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९०४ विमानांमधील १ लाख ९ हजार ११८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात पुणे व नागपूर विमानतळावर देखील स्क्रीनिंग सुरू झाले आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ५६० प्रवासी आले असून ३०५ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत २७३ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी २५८ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे. इतर १५ जणांचे अहवाल आज, सोमवारी प्राप्त होतील. सध्या १३ जण मुंबईत, तर दोन संशयित पुणे येथे भरती आहेत.
त्या थर्मामीटरच्या किंमतीमध्ये वाढ
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी वापरात येणाऱ्या थर्मामीटरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. परदेशामध्ये तापमान घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या थर्मामीटरसाठी असलेल्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. भारत हा प्रमुख उत्पादक देश असल्यामुळे ही मागणी अधिक असल्याचे उत्पादक कंपन्यांनी सांगितले. यापूर्वी दीड ते दोन हजार रुपयांना मिळणाऱ्या या थर्मामीटरची किंमत पाच हजार रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.
Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipal-corporation-ready-to-tackle-coronavirus/articleshow/74541197.cms