मुंबई बातम्या

पुणे-मुंबई प्रवासादरम्यान उबर चालकाला लागली झोप, पण टळली मोठी दुर्घटना – Loksatta

हल्ली आयुष्य इतकं धकाधकीचं झालं आहे की, कधी कुठे जावं लागेल सांगता येत नाही. कामानिमित्त लवकर पोहोचण्यासाठी अनेक लोकं कॅबला (भाड्यानं मिळणारी गाडी) प्राधान्य देतात. कारण आरामदायक प्रवासाबरोबरच ड्रायव्हिंग करण्याचंही टेन्शन नसतं. पण, काही वेळेला कॅबनं जाण्याचा निर्णय धाडसी ठरू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे.

पुणे-मुंबई प्रवासादरम्यान ही घटना घडली आहे. ही घटना पुण्याजवळील आहे. पुण्यातील एका महिलेला मुंबईला जायचं होतं. तेजस्वीनं असं या महिलेचं नाव आहे. मुंबईला जाण्यासाठी त्यांनी उबर कॅब बुक केली. कॅब चालकानं महिलेला बुक केलेल्या ठिकाणावरून पिकअप केलं आणि मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. पण, पुणे सोडल्यानंतर काही किलोमीटर पार केल्यानंतर अचानक चालक डुलक्या घेऊ लागला. चालकाला इतकी झोप यायला लागली की, त्याच डोक स्टेअरिंगवर टेकू लागलं.

दरम्यान, उबरचालकाला झोप येत असल्याचं पाठीमागे बसलेल्या महिलेच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ चालकाला गाडी उभी करायला सांगितली. चालकाला बाजूच्या सीटवर बसायला सांगून महिलेनं स्वतः गाडी चालवत मुंबईपर्यंत आणली. या प्रवासादरम्यान, बाजूला बसलेला चालक झोपून होता. त्याचा एक व्हिडीओ तयार करून महिलेनं ट्विट केला. तसेच उबरकडं यासंदर्भात तक्रार दाखल केली. पण, वेळीच तेजस्वीनी यांचं चालकाकडं लक्ष गेल्यानं मोठी दुर्घटना टळली.

तेजस्वीनी भडकल्या?

या प्रसंगानंतर तेजस्वीनी यांनी व्हिडीओ ट्विट करून आपला राग व्यक्त केला. ‘देवाचे उपकार आहेत की, मी यावेळी जिवंत आहे. हे सगळं घडत असताना मी झोपलेली नव्हते. मला खूप राग आला आहे. जर व्यवस्थित आराम झालेला नव्हता, तर गाडी चालवण्याची हिंमत कशी होते? हे दुसऱ्यांचं आयुष्य धोक्यात कसं घालवू शकतात?,’ असं तेजस्वीनी यांनी म्हटलं आहे.

उबर काय म्हणाले?

तेजस्वीनी यांनी उबरच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याची तक्रार केली. उबरनं तातडीनं याची दखल घेतली. उबर याबद्दल तेजस्वीनी यांची दिलगिरी व्यक्त केली. तसेच तातडीनं मदत करण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्याकडून मोबाईल नंबरही घेतला जेणेकरून संपूर्ण घटनेची चौकशी करता येईल. या सगळ्या प्रक्रियेत तेजस्वीनी स्वतः कार चालवत मुंबईला पोहोचल्या होत्या.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 4, 2020 5:42 pm

Web Title: uber driver sleep while driving on pune mumbai highway bmh 90

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/uber-driver-sleep-while-driving-on-pune-mumbai-highway-bmh-90-2100027/