मुंबई बातम्या

मुंबई पालिकेने थकवले १६ हजार कोटी – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत एमएमआरडीच्या माध्यमातून अनेक प्रकल्प राबविले जातात. भांडवली खर्चापैकी १६ हजार ६६४ कोटी रुपयांची रक्कम मुंबई महानगरपालिकेकडून एमएमआरडीएला येणे अपेक्षित आहे. झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत एमएमआरडीए ८८.७५ कोटींची रक्कम मुंबई महानगरपालिकेला देणे लागते. त्यामुळे ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यासाठी प्राधिकरणाने विनंती केली आहे. त्या संदर्भात कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.

आ. संजय पोतनीस यांनी मुंबईतील पायाभूत सुविधा शुल्कापोटी जमा होणाऱ्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री शिंदे बोलत होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनवर्सन योजनेंतर्गत सुरू असलेले प्रकल्प निधीअभावी अपूर्ण राहणार नाहीत. मुंबईत विविध प्राधिकरणाच्या माध्यमांतून प्रकल्प राबविले जातात, त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या कामांना गती देण्यात येणार आहे. तसेच, या प्रकल्पातून स्थानिक स्वराज्य संस्थांना देय असलेली रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-municipality-tired-of-rs-3000-crore/articleshow/74463579.cms