मुंबई बातम्या

मुंबई APMC वर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपची दाणादाण – Maharashtra Times

मुंबई APMC वर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपची दाणादाण
नवी मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यानंतर स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणंही झपाट्यानं बदलत असून त्याचा फटका भाजपला बसत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election Results) निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) दणदणीत विजय झाला असून भाजपची दाणादाण उडाली आहे. भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

राज्यात सत्ता असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व छोटी-मोठी सत्तास्थानं ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपनं लावला होता. सत्ता गेल्यानंतर हे चक्र उलटं फिरू लागलं आहे. काही जिल्हा परिषदांनंतर आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपची पुरती पिछेहाट झाली आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीनं वर्चस्व राखलं आहे.

वाचा: आदित्य ठाकरेंचं काम बघा; छोट्या पवारांचा भाजप नेत्यांना टोला

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमधून यंदा सुमारे ९३ टक्के मतदान झालं होतं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी व चार व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी हे मतदान झालं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत महाविकास आघाडी व भाजपच्या उमेदवारांमध्ये होती. त्यात महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे.

वाचा: हा डोक्यावर पडला काय?; आव्हाड भडकले

कांदा बटाटा मार्केटमधून अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे यांनी के. डी. मोरे यांना पराभवाची धूळ चारली. मसाला मार्केटमधून विजय भुता यांनी कीर्ती राणा यांचा पराभव केला आहे. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केटमधून संजय पानसरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे. अमरावती विभागातून काँग्रेसचे प्रवीण देशमुख व शिवसेनेचे माधव जाधव विजयी झाले. अन्य विभागांमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी निर्विवाद आघाडी घेतली आहे.

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/big-jolt-to-bjp-maha-vikas-aghadi-wins-mumbai-apmc-election/articleshow/74438942.cms