मुंबई बातम्या

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा – Loksatta

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठा विजय मिळवला असून भाजपाचा धुव्वा उडाला आहे. भाजपाचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

या निवडणुकीत कांदा-बटाटा मार्केटमधून अशोक वाळूंज, भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे, मसाला मार्केटमधून विजय भुता, धान्य मार्केटमधून निलेश विरा, कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे, फळ मार्केटमधून संजय पानसरे हे निवडून आले आहेत.

राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. यामध्ये ९२.५७ टक्के मतदान झालं. या निवडणुकीसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान पार पडलं. त्याचबरोबर सहा महसूल विभागातून १२ शेतकरी प्रतिनिधी आणि चार व्यापारी प्रतिनिधींची यातून निवड झाली.

या निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचंच पॅनल तयार करण्यात आलं होतं. तर त्यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार दिले होते. या निवडणुकीत महसूल विभागात ९८.७२ टक्के मतदान झालं तर व्यापारी मतदारसंघात ८७.२१ टक्के मतदान झालं. त्याचबरोबर कोकणात सर्वाधिक ९९.६४ टक्के, अमरावतीत ९९ आणि पुण्यात ९९ टक्के इतकं मतदान झालं.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on March 2, 2020 3:43 pm

Web Title: mahavikas aaghadi wins election of mumbai apmc market aau 85

Source: https://www.loksatta.com/maharashtra-news/mahavikas-aaghadi-wins-election-of-mumbai-apmc-market-aau-85-2098435/