मुंबई बातम्या

राष्ट्रवादीचं ‘मिशन नंबर-२’; मुंबई पालिकेसाठी केला ‘हा’ प्लान – Maharashtra Times

राष्ट्रवादीचं ‘मिशन नंबर-२’; मुंबई पालिकेसाठी केला ‘हा’ प्लान
मुंबई: आगामी काळात मुंबई महापालिकेतही दबदबा निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने ‘मुंबई पालिका मिशन नंबर-२’ची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना नंबर वनचा पक्ष असून शिवसेना नंबर वनच राहिली पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आली पाहिजे, असं सांगतानाच मुंबई पालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या ८वरून ५० ते ६०वर गेली पाहिजे. त्यासाठी कामाला लागा, असे आदेशच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आज दिले.

चुनाभट्टी येथे राष्ट्रवादीचं कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबिराला मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी’ मिशन नंबर-२’ ची हाक दिली. शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे. ती राहिलीच पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर राहिली पाहिजे, असे अजितदादा पवार म्हणाले. विधानसभेत नवाब मलिक निवडून आले आहेत. येत्या काळात मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आणावयाचे आहेत. मुंबईतून जास्तीत जास्त १० आमदार आणि मुंबई महानगरपालिकेत ५० ते ६० नगरसेवक आले पाहिजेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी महिन्याचा एक दिवस मुंबईसाठी देणार असल्याचेही जाहीर केले. १६ मंत्र्यांनी मुंबईसाठी एक एक दिवस जरी दिला तरी चांगलं नियोजन होऊन आणि पक्षाचे संघटन वाढेल, असा प्लानही त्यांनी दिला.

‘विरोधकच म्हणतील; ‘ये दीवार टूटती क्यूँ नही’

मिशन शिवसेनेच्या विरोधात नाही

राज्यात आपल्या विचाराचं सरकार आलं आहे, तसं आपल्या विचाराची महानगरपालिका आली पाहिजे. दोन वर्षात मुंबई महानगरपालिका निवडणूक येत आहे. त्यासाठी नगरसेवक निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले. हे मि‌शन शिवसेना व इतर पक्षांच्या विरोधात आहे, अशा वावड्या उठवल्या जात आहेत. परंतु आमचे हे मिशन पक्षाचा जनाधार कसा वाढेल यासाठी आहे. जे मुंबईचं महत्त्व कमी करण्याचे काम होत आहे ते पूर्ववत करण्याचं काम यातून होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेची विचारधारा वेगळी आहे. मात्र भाजपपेक्षा किती तरी चांगली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आघाडी केली आहे, असं सांगतानाच मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले आहे. प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासात आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे, असा इशारा देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अजित पवार यांनी यावेळी फुंकले आणि एक उर्जा कार्यकर्त्यांमध्ये भरण्याचे काम केले. महाराष्ट्रातील माझ्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापसात संघर्ष न करता पक्षाचे काम कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. तुम्ही चांगले वागलात तर ते तुमच्याशी चांगले वागतील, असा कानमंत्रही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

भाजपच्या लोकांपासून लेकींना धोका: राष्ट्रवादी

भाजपाने दिल्लीत सगळे मंत्री, खासदार उतरुवूनही दिल्लीत आम आदमी पार्टीला ६२ जागा कशा मिळाल्या. तर त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष दिले. त्यामुळे आपण लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे. मुंबईच्या कार्यकर्त्यांना ताकद दिली तर राष्ट्रवादीला यश नक्की मिळेल. मुंबई महापालिकेच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीला आतापासूनच कामाला लागलो तर ५० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येवू शकतात, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुंबईत झाला आहे. मात्र पक्षाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केलं गेले आहे. देशात आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची लोकप्रियता वाढत आहे तशी काम करण्याची त्यांची तरुणांसारखी उमेदही वाढत आहे. मात्र आपण कार्यकर्ते कमी पडत आहोत, अशी खंतही पटेल यांनी व्यक्त केली.

पुण्यात जुना वाडा कोसळला; वृद्धेसह दोघे जखमी

Source: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/sharad-pawar-now-eyes-mumbai-ncps-mission-mumbai/articleshow/74426012.cms