मुंबई बातम्या

ग्रेट बॉम्बे सर्कस झाली शंभर वर्षांची – Sakal

म्हैसाळ : सांगलीला नाट्यपंढरी म्हटलं जातं तसं म्हैसाळ (ता.मिरज ) या गावाची देशभर सर्कशीचे माहेरघर म्हणून ओळख होती.जगप्रसिद्ध देवल सर्कस,प्रभात आणि ग्रेट बॉब्मे सर्कशीच्या नेत्रदीपक आणि भव्य खेळामुळेच ही ओखळ जगभर पसरली होती.याच पांढरीतील स्वतां :च्या सर्कशीच्या वेडाने झपाटलेल्या भाऊसाहेब कदम-कामेरे आणि दत्तात्रय कदम-कामेरे या बंधूंनी सन 1920 ला कराची मध्ये सर्कशीची मुहूर्तमेढ रोवली.विशेष म्हणजे काळाच्या ओघात होत असलेले बदल स्विकारत आजही बॉम्बे सर्कस तग धरुन उभी आहे.शतकपूर्ती निमित्ताने लवकरच पुणे अथवा मुंबई येथे स्नेहमेळावा होणार आहे. 

पूर्वी शेती शिवाय दुसरा कोणताही व्यवसाय नसल्यामुळे बहुतांशी तरूण वर्ग एकतर मुंबईमध्ये हमाली साठी जायचं किंवा सर्कस मध्ये भरती व्हायचा. कदम बंधूंचे चुलते क्‌.बाळकृष्ण कदम हे सर्कशीत ट्रेनर म्हणून काम करत होते. त्यांनी लहानग्या भाऊसाहेब व दत्तात्रय यांना सर्कशीत कामासाठी नेले.म्हैसाळच्या कै.बाबासाहेब देवलांनी स्थापन केलेल्या त्याकाळातील जगप्रसिद्ध देवल सर्कशीत , तासगांव मधील परशुराम लॉयन सर्कस आणि इंडियन बहाद्दूर सर्कशीत कदम बंधूंनी काम करुन नाव कमावले.

दरम्यानच्या काळांत स्वमालकीची सर्कस उभी करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देईना.यातून दोन ते तीन वेळा सर्कस उभी करण्याचा अयशस्वी प्रयत्न त्यांनी केला.अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा जोमाने फेरमांडणी केली आणि कराची पाकिस्तान येथे सन 1920 मध्ये ग्रेट बॉम्बे सर्कशीची स्थापना केली.सर्कशीला खऱ्या अर्थाने भारत स्वतंत्र झाल्यानंतर भरभराटीचे दिवस आले.

या क्षेत्राचा सुवर्णकाळ जगभराने पाहिला.काळाच्या ओघात बऱ्याच अडचणीवर मात करीत ग्रेट बॉम्बे सर्कशीची वाटचाल अजुनही सुरु आहे.ग्रेट बॉम्बे सर्कशीला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी,लाल बहादूर शास्त्री, मोरारजीभाई देसाई, यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई या थोर विभूतींचे पाठबळ लाभले होते. 

प्रसंगी पदरमोड करून सर्कस टिकवून ठेवली

कै.भाऊसाहेब आणि कै.दत्तात्रय कदम-कामेरे यांनी स्थापन केलेली ग्रेट बॉम्बे सर्कस आम्ही आजही त्याच जोमाने चालवित आहोत.शभंर वर्षात या व्यवसायाने बरेच चांगले वाईट दिवस पाहिले आहेत.यातील बदलांना सामोरं जात प्रसंगी पदरमोड करून सर्कस टिकवून ठेवली आहे.सध्या चेन्नई येथे सर्कशीचे खेळ सुरू आहेत. 
के. एम. संजीवकुमार, सध्याचे मालक ग्रेट बॉम्बे सर्कस. 

लवकर स्नेहमेळाव्याचा सोहळा करणार

आमच्या घरातील स्थापना असलेल्या ग्रेट बॉम्बे सर्कशीच्या शतकपूर्ती निमित्ताने पुणे अथवा मुंबई येथे सर्कशीतील सर्व घटकांना एकत्र करून लवकर स्नेहमेळाव्याचा सोहळा करणार आहोत. 
डॉ. वसंतराव कदम-कामेरे व दिपक कदम-कामेरे, 
कै.भाऊसाहेब व दत्तात्रय कदम-कामेरे यांचे वारसदार. 

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra/great-bombay-circus-became-hundred-years-old-266051